Skip to main content

हिमालय यात्रा

चारधाम यात्रा – देवभूमी उत्तराखंड

 

(All photos captured on iPhone 13 Pro Max by Rohan Chitale – the magician!)

माझे लहानपणापासून स्वप्न होते…हिमालयात जायचे…

तेथील देव-भूमीतील चैतन्य, पावित्र्य, तपस्वी महापुरुषांचे जीवन आणि सर्व जगात कुठेही पहायला न मिळालेले दिव्यातिदिव्य असे अद्भुत दर्शन, निसर्ग, अलौकिकत्व पहायचे, अनुभवायचे…!

“हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात” हे
“श्री स्वामी राम” यांचे आश्चर्यकारक अनुभूतींनी भरलेले पुस्तक….

योगानंद परमहंस, महामहोपाध्याय पंडित गोपिनाथ कविराज वाराणसी, महाराष्ट्रातील रामकृष्ण महाराज, साईकाकाजी अशा अनेक थोर सत्पुरुषांचे जीवनचरित्र वाचल्यामुळे आणि प्रबळ आंतरिक ओढीमुळे हिमालयात जायचेच होते…!

पण कसे, केव्हा, काय-पहायचे…काहीही माहीत नव्हते…

माझ्या आयुष्यात अत्यंत जिवलग, माउलीस्वरूप किंबहुना एकमेव आणि नित्यस्मरणीय असे श्रीस्वामी स्वरूपानंद पावस यांच्या कृपेने, श्री कृष्णदासजी (सुदेश चोगले) यांच्या असीम प्रेम आणि मार्गदर्शनाने व मीराताईंच्या (मीरा पोतदार) सहज सांगितलेल्या माहिती आणि अनुभवाच्या गोष्टींमुळे,

श्री परमपूज्य सद्गुरुदेव जोशी काका महाराज यांच्या पूर्ण आशीर्वादाने,

ज्ञानगंज/ ग्यानगंज (विश्वातील सर्वात अद्भुत सत्ता असलेले गुप्त ठिकाण) येथें आवागमन करणारे थोर सत्पुरुष श्रीसाईकाकाजी….

या थोर महापुरुषांच्या प्रबळ कृपेने आणि कृपेनेच केवळ आमची चारधाम यात्रा सफल, सुखरूप आणि चैतन्यमय झाली!

चारधामला जायच्या अगोदर महाराष्ट्रातील अत्यंत अलौकिक संत, योगीजन आणि अवधूत कोटीचे महात्मे यांचे समाधी रूपात दर्शन…अक्षरशः खेचून नेल्यासारखे घडले…! मलाही कळत नव्हते मी अचानक कुठे आणि कसा खेचला जातोय.

जिथे जाईल तिथे देवाने विशेष प्रेम आणि कृपेची प्रचिती दाखवून दिली…!

गोंदवल्यात काहीही न ठरविता, ओळख न दाखवता अचानक गेलो तर महाराजांच्या समकालीन असलेल्या थोर सत्पुरुषांच्या पादुकांचे दर्शन झाले… त्या पादुका समाधीस्थानी आणि पालखीमध्ये ठेवायला मिळाल्या..

श्रीमहादेवनाथांचे समाधी मंदिराचे (श्रीस्वामी स्वरूपानंद यांचे परात्पर गुरू, चिंचणी, सांगली) कुलूप लावलेले असताना अचानक त्यांच्या भक्ताने येऊन स्वतःहून उघडून दिले आणि संजीवन समाधीपाशी साधन झाले…

श्रीसाईकाकाजींच्या समोर साधन झाले आणि गाडीतून निघालो तर गेट बंद!!

थोड्या वेळाने गेट उघडले तरी…काकाजींनी सांगितले “तुम्हाला बाबा लोकांनी थांबवले, आपल्याबरोबर आम्हाला पंक्तीचा लाभ मिळेल” (काकाजींची नम्रताच ही)…साईकाकांबरोबरच प्रसादभोजनाचा लाभ मिळाला. नंतर मी विचारले…बाबा लोकं म्हणजे कोण?

असे विचारल्यावर त्यांनी सांगितले “आम्ही गणेशपुरीचे थोर अवधूत भगवान नित्यानंद, बाबा मुक्तानंद आणि साईबाबा ह्यांना बाबा लोक म्हणतो…”

श्रीकृष्णदासजी आणि मीराताईंची अचानक न ठरवता घडलेली भाद्रपद पौर्णिमा दि. २० सप्टेंबर २०२१ ची भेट आणि श्रीमहादेवनाथांच्या संजीवन समाधीसमोर झालेले साधन…. याच तिथीस १९९० साली श्रीकृष्णदासजी यांना झालेला श्रीकृष्ण सरस्वतींचा स्वामींचा अनुग्रह हे पाहता हा एक असाधारण योग आहे हे निश्चित…! याच दिवशी सौ. उज्वला काकूंच्या घरी सौ. पूजा देसाई चाफळकर यांना सहज…पावसच्या श्रीस्वामींचा एखादा अभंग गाता का…असे विचारल्यावर त्यांनी वर्षोनवर्षे न गायलेला अभंग अचानक गायला तो खालीलप्रमाणे…

“कृपावंत भला सद्गुरू लाभला | अंगिकार केला तेणे माझा ||१||
अंतरींची खूण दाखवोनी मज | सोहं-मंत्र गुज सांगितले ||२||
ठायीं चि लागली अखंड समाधी | संपली उपाधि अविद्येची ||३||
स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला | संसार तो झाला मोक्ष-मय” ||४||

Listen to the Abhanga below:

केदारनाथलाही असेच झाले…कुणीतरी साधु येऊन त्यांनी मला मंदिराच्या आत गर्भगृहाकडे नेले व दर्शन घडविले….

यमुनोत्रीला १२ ते १६ हजार फुटांवर उगवणारे ब्रह्मकमळ, जे योगीजन प्रचंड कष्टाने मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, ते यमुनोत्रीच्या मंदिरात यमुना देवीच्या चरणावर असलेले “ब्रह्मकमळ” तेथील साधूंनी मला काहीही न सांगता, माझ्या मनातही नसताना स्वतःहून काढून दिले आणि सांगितले हे खूप भाग्याचे लक्षण आहे…”शंकर भट्ट यांनी लिहिलेल्या श्रीपाद वल्लभ चरित्रात ह्याचे महत्त्व कळते”…!

गंगोत्रीला तेथील पूजा करणाऱ्यांनी मंदिराविषयी सर्व काही शांतपणे समजावून गंगोत्रीचा प्रसाद दिला… गंगापूजन, स्नान आणि साधन झाले!

बद्रीनाथला मनात कसलाही विचार नसताना ध्यानसाधनेत आद्य शंकराचार्य डोळ्यासमोर येत होते…
बद्रीनाथची मूर्ती आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केली हे नंतर वाचले.

हे अनुभव लिहिण्याचे कारण नमस्कार/चमत्कार नसून “चैतन्य आहेच आहे” ह्याची प्रचिती आल्यामुळे दृढ-श्रद्धा आणि शरणागति उदयास येते…हे आहे!

उत्तराखंड चारधाम घडण्यापूर्वी….

बत्तीस शिराळा – गोरक्षनाथ मंदिर, मिरजेचे अवधूत अण्णाबुवा महाराज, चौसष्ट योगिनी मंदिर अमरापूर, दादा गावंड समाधी ठोसेघर सज्जनगड, कोल्हापूरचे अवतारी सिद्ध श्रीचिले महाराज समाधी, नरसोबावाडी आणि औदुंबरला श्रीस्वामींचे दर्शन, श्रीभुवनेश्वरी, अक्कलकोट स्वामी, भगवान शुकाचार्य समाधी स्थान, ब्रह्मानंद महाराज समाधी, पलूसचे सिद्ध धोंडीराम महाराज, आनंदमूर्ती आणि रामानंद महाराज समाधी, धनकवडीचे शंकर महाराज यांची समाधी, योगीराज गुळवणी महाराज शक्तिपीठ, श्रीस्वरूपानंद स्वामी पावस, कनकादित्य मंदिर कशेळी, विश्वेश्वर मंदिर पावस, चौरंगीनाथ सोनसळ, किल्ले-मच्छिन्द्रगड समाधी, श्रीकृष्ण सरस्वती स्वामी जन्मस्थान नांदणी आणि शेकडो सिद्ध पीठे आणि सत्पुरुषांची स्थाने यांचे काहीही न ठरवता सहजच दर्शन घडले.

उत्तराखंड चारधाम यात्रा घडताना…. हनुमान चट्टी

वशिष्ठ गुंफा

व्यास गुंफा (जिथे महाभारत लिहिले गेले)

श्री गणेश गुंफा

सरस्वती नदीचा प्रचंड उगम

आणि तेथील भीमशीळा…

मानापास भारतातील शेवटचे….भारत-चीन सीमेवरील गाव

स्वर्गीय वसुधारा यांचे दुरून होणारे अलौकिक दर्शन, रुद्रप्रयाग, विष्णुप्रयाग, देवप्रयाग, काशीविश्वनाथ, शक्तिमाता

भैरवनाथ… नीम करोली बाबा समाधी

श्री दयानंद सरस्वती समाधी

जन्मसिद्ध अवतारी आनंदामयी माँ समाधी

केशव आश्रम

हरिद्वार आणि ऋषिकेशचे गंगास्नान, शिवानंद कुटी, ऋषिकेशची गंगाआरती, राम आणि लक्ष्मण झूला

दक्षप्रजापति मंदिर, दशमहाविद्या मंदिर, महाकाली मंदिर

नवग्रह आणि प्रचंड श्रीयंत्र मंदिर

रुद्राक्ष वृक्ष…

हे सर्व काही…केवळ १० दिवसात घडले हे अजूनपण पटत नाही आणि आज 8 October 2021 रोजी ऑफिसमध्ये आल्यावर थकवा पण नाही….!

ही चारधाम यात्रा जाता जाता घडणारी नाही हे निश्चित!

उत्तराखंड सरकारच्या E-Pass च्या अडचणींमुळे होता होत नसलेले केदारनाथचे दर्शनसुद्धा श्रीस्वामींनी दिलेल्या प्रेरणेमुळे सहज घडले आणि केदारनाथमध्ये हिमालयीन स्पंदनांमध्ये वास्तव्य आणि ध्यानही करता आले….! केदारनाथसाठी कांचन मावशीचे प्रयत्न आणि विशेषकरून गौरीआत्याचे यश आलेले प्रयत्न हे गुप्तकाशीपर्यंत पोहचण्यात सहाय्यकारी ठरले!

माझी पत्नी सौ. ईश्वरीची पूर्ण साथ, मनापासून चारधाम करण्याची तयारी आणि शुद्ध भक्ति, श्रीधरकाकाचे Trekking and Mental Fitness चे अनुभव….हे सर्व…यात्रेसाठी अत्यंत सहाय्यक ठरले!

शेवटी…government सकट समस्त विश्वाला Govern करणाऱ्या केदारनाथ आणि श्रीस्वामींसमोर कुणाचे काय चालणार हेही अनुभवास आले!

ही यात्रा होण्यासाठी महत्वाच्या वाटलेल्या गोष्टी म्हणजे “प्रचंड आंतरिक तळमळ आणि प्रबळ इच्छा, श्रीसद्गुरूंच्या चरणी पूर्ण शरणागति, सकारात्मकता, यात्रा आणि देवभूमीत आहे याची अखंड असलेली जाणीव आणि तसे आचरण…

आणि सर्वात महत्वाचे “श्रीसद्गुरूंची पूर्ण कृपा!”

श्रीकृष्णदासजींमुळेच आणि मीराताईंमुळेच केवळ….ही यात्रा आनंदाची आणि पूर्ण तृप्ततेची झाली यात शंका नाही!!

“| हिमवंतु दोष खाये…
परि जीविताची हानी होये | “…

ही ज्ञानेश्वरीतील कृष्णदासजींनी सांगितलेली ओवी श्रीस्वामींनी परीक्षारूपात जरी आमच्याकडून करवून घेतली असली तरी कुठेही कसलाही त्रास, संकट, अडचण न येता यात्रा सुखद, क्षणोक्षणी आनंददायी, रोमहर्षक आणि सफल झाली!

या प्रत्येक धाम दर्शनाच्या वेळी आई बाबा सोबत हवे होते असे कितीदा मनात आले!!

चारधाम यात्रा खूप भितीदायक आहे वगैरे गैरसमजांमुळे आम्ही फार काही कोणाला सांगितले नव्हते….नाहीतर विनाकारण लोक चिंता करत राहिले असते…!

अध्यात्मविद्येचे माहेरघर असलेल्या या पवित्र भारतभूमीतील अतिपवित्र देवभूमी हिमालय…

भगवान श्रीशंकराच्या जटेतून उत्पन्न झालेला, भगीरथ प्रयत्नाने पृथ्वीतलावर आलेला व हिमालयाच्या दऱ्यांतून खळखळत वाहणारा गंगाप्रवाह, चालण्यासही कठीण अशा या दुर्गम भागात आपल्या पूर्वजांनी बांधलेली भव्यदिव्य मंदिरे, या सर्वांचे दर्शन, गंगेच्या अतिशीतल प्रवाहातील स्नान, हा सर्व स्वर्गीय आनंद प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी घेतलाच पाहिजे असे वाटते. आणि हिमालयातील गुप्त गुहांमध्ये साधनेत रत असलेल्या सिद्धांचे आशीर्वाद अध्यात्मसाधनेत प्रगति करू इच्छिणाऱ्या साधकांस वरदानच
ठरतील!

Now…Back with Divine Energy, Positivity and Full Force😊!

— रोहन चितळे (८ ऑक्टोबर २०२१)

Some Spectacular Captures!

Tehri Jheel…

Golden Mountain Kedarnath…

Kedarnath Temple and Majestic Mountains…

Nature’s Spectacle…

Mr Chitale Rohan Contemplating…

River Mandakini…

Amazing Gangaji Temple…

Heavenly Alaknanda River…

Himalayas Captured From Auli…

Mr Chitale Rohan in Auli…

Majestic View of Ganga and Mountains…

Welcome to our world of Filmmaking that is “Beyond Genius”

VISIT BEYOND GENIUS WEBSITE
Don`t copy text!